Ad will apear here
Next
किनकेड साहेबाने ११२ वर्षांपूर्वी मोटारीने केलेली संगम माहुलीची सफर!
संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराजांची समाधी

जुनी स्थलवर्णने वाचताना नेहमीच मजा येते, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळात एखाद्या ठिकाणी जाण्याच्या सोयीसुविधा, तसेच वाहने यांची उपलब्धता आपल्याला त्यामधून समजून येते किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी करायचा प्रवास किती खडतर असायचा, हेदेखील समजून येते. 

आजकाल आपण सगळे कारने प्रवास मोठ्या प्रमाणात करतो. परंतु जवळपास ११२ वर्षांपूर्वी ‘मोटरगाडी’ हे प्रकरण फारच नवीन होते. याच काळात चार्ल्स अलेक्झांडर किनकेड हा सातारा शहराचा डिस्ट्रिक्ट जज म्हणून काही काळ सातारा येथे वास्तव्य करून होता. या आपल्या वास्तव्याच्या काळामध्ये चार्ल्स किनकेड याला सातारा हा प्रांत फारच आवडला. याच काळात त्यांनी त्यांच्या एका भारतीय मित्राकडे संगम माहुली पाहण्याची इच्छा व्यक्त केली. 

त्याच दिवशी मित्राशी बोलून त्यांचे संगम माहुली येथे जाण्याचे ठरवले. चार्ल्स किनकेड यांच्या मित्राच्या घरी त्या दिवशी काही पाहुणे ‘मोटरगाडी’ घेऊन आले होते. त्यामुळे या सर्वांनी संगम माहुली इथे मोटरगाडी घेऊन सहलीला जायचे ठरवले. त्या काळी मोटरगाडी हे प्रकरण नवीन असल्याने आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित होऊन मोटरगाडी कुतूहलपूर्ण नजरेने बघत असत. 

संगम माहुली येथील प्रवास हा अवघ्या तीन मैलांचा होता. या सहलीमध्ये तीन जणांना गुजराथी येत होते, तसेच चार जणांना इंग्रजी येत होते, तर पाच जणांना मराठी येत होते. सगळ्यांच्या सहमतीमुळे मराठी भाषेमध्ये त्यांचे संभाषण या प्रवासामध्ये झाले होते. तसेच चार्ल्स किनकेड यांनादेखील मराठी भाषा उत्तम प्रकारे येत होती. 

संगम माहुलीच्या या सहलीचे प्रवासवर्णन आपल्याला ‘द टेल ऑफ द तुलसी प्लँट अँड अदर स्टडीज’ या पुस्तकात ‘टू माहुली बाय मोटर’ या प्रकरणात वाचता येते. जवळपास ११२ वर्षांच्या कालखंडात आपण काय काय गोष्टी बघण्यासाठी मुकलेलो आहोत हे या प्रवासवर्णनावरून समजते.

चार्ल्स किनकेड आणि मंडळी जेव्हा संगम माहुली येथे जाऊन पोहोचली, त्यानंतर चार्ल्स किनकेड आपल्या वर्णनामध्ये लिहितात, की कृष्णा नदी माहुली गावाच्या मधूनच वाहत असल्याने गावाचे दोन भाग झालेले आहेत. एक ‘श्रीक्षेत्र माहुली’ तर दुसरे ‘संगम माहुली.’ संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगम होतो. या नदीच्या संगमाचा उल्लेख वाल्मिकी रामायणातदेखील आहे असे म्हणतात, असेही चार्ल्स किनकेड यांनी नमूद केलेले आहे. तसेच समर्थ रामदास स्वामीदेखील विविध प्रसंगी माहुली येथे आल्याचे देखील उल्लेख आहेत, असे ते नमूद करतात. 

पुढे चार्ल्स किनकेड असे लिहितात, की एकदा ग्रहणकालामध्ये छत्रपती शाहू महाराज (पहिले) माहुलीच्या संगमावर स्नान करण्यासाठी आले असताना, तिथे संकल्प सांगण्यास कोणीही राजोपाध्ये नव्हते. राजाराम महाराजांनी पंतप्रतिनिधीचे नवे पद तयार केले होते. त्या पदावर असलेले श्रीनिवासराव ऊर्फ श्रीपतराव महाराजांच्या सोबत होते. कुणीही ब्राह्मण उपस्थित नाही म्हणून पंतप्रतिनिधी यांनीच संकल्प सांगितला आणि हा प्रसंग निभावून नेला. म्हणून संगम माहुली येथील गावठाण पंतप्रतिनिधी यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून दक्षिणेच्या रूपाने मिळाली. १२० बिघ्यांची मिळालेली ही दक्षिणा श्रीनिवासराव यांनी स्वतःसाठी न वापरता त्या ठिकाणी ६० घरे बांधली आणि चार शाखांच्या दशग्रंथी ब्राह्मणांची तिथे वस्ती करविली. यासाठी त्या भागाला वस्ती माहुली असेदेखील म्हटले गेले. 

क्षेत्र माहुली येथील बरीचशी मंदिरे पंतप्रतिनिधी यांनी बांधलेली आहेत. यापैकी दहा मंदिरे कृष्णेच्या पूर्व काठावर आहेत. कृष्णेच्या पूर्व काठावर राधा-शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर ज्या घाटावर आहे तो घाट बापूभट गोविंदभट यांनी इ. स. १७८०च्या सुमारास बांधला, तर मंदिर भोरच्या पंतसचिवांच्यापैकी ताईसाहेबांनी इ. स. १८२५च्या सुमारास बांधले. याच काठावर असलेले दुसरे देऊळ श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी इ. स. १७४२मध्ये बांधले. ते बिल्वेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या पलीकडे घाटाच्या पायऱ्या इ. स. १७३८मध्ये आनंदराव भिवराव देशमुख अंगापूरकर यांनी बांधविल्या. तिसरे रामेश्वराचे मंदिर हे त्याही अगोदर म्हणजे इ. स. १७०८मध्ये देगाव येथील परशुराम नारायण अनगळ यांनी बांधविले होते. 

याच्यासमोर पश्चिम काठावर दुसऱ्या बाजीरावाने बांधलेला घाट अपुरा राहिलेला आहे. तसेच पश्चिम घाटावर दत्तात्रेय, शंकर-पार्वती, हनुमान यांचीदेखील मंदिरे आहेत. बिल्वेश्वर मंदिराच्या समोर पश्चिम काठावर संगमेश्वर महादेवाचे हेमाडपंती मंदिर आहे. हे मंदिरदेखील इ. स. १७४०मध्ये श्रीपतरावांनी बांधविले. याशिवाय वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर सर्वांत मोठे असे मंदिर आहे, ते विश्वेश्वर महादेवाचे आहे. हे मंदिरदेखील श्रीपतरावांनी इ. स. १७३५मध्ये बांधले. 

याच ठिकाणी इ. स. १७४४मध्ये पोर्तुगीजांच्या वसई मोहिमेतून पळवून आणलेली घंटा आहे. दुसरा बाजीराव आणि सर जॉन माल्कम यांची माहुलीस भेट झाल्याचा उल्लेखदेखील सापडतो. माहुली स्थलविशेष या क्षेत्रमहात्म्यातही आहे. इ. स. १८६५मध्ये साताऱ्याच्या राणीसाहेबांनी बांधलेल्या देवळाजवळ आणि घाटाजवळ छत्रपतींच्या घराण्यातील कित्येक व्यक्तींच्या समाध्या आहेत, असे सगळे वर्णन या प्रवासवर्णनात चार्ल्स किनकेड नमूद करतात.

चार्ल्स किनकेड यांनी आपल्या माहुलीच्या सहलीच्या वर्णनात लिहिले आहे, की दुसऱ्या शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी राजघराण्याच्या शिरस्त्यानुसार माहुली येथेच करण्यात आला. सगुणाबाई या शाहू महाराजांच्या राणीसाहेबांनी इ. स. १८७४मध्ये शाहूसमाधी बांधून घेतली. या समाधीच्या शेजारी अन्य आप्तांच्या समाध्या आहेत. त्या सर्व समाध्यांत एक समाधी आगळीवेगळी आहे. ती आहे शाहू महाराजांच्या प्राणप्रिय खंड्या नामक कुत्र्याची. शाहू महाराजांच्या दरबारात या खंड्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते, असे म्हणतात, असे चार्ल्स किनकेड यांनी आपल्या प्रवासवर्णनात लिहिले आहे.

चार्ल्स किनकेड यांनी लिहिले आहे, की शाहू महाराज खंड्याला आपल्यासोबत घेऊन शिकारीला गेले असता त्यांची नजर दुसरीकडे होती, त्या वेळी एक वाघ त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी खंड्या कुत्र्याने मोठमोठ्याने भुंकून महाराजांना सावध केले आणि त्यांचे प्राण वाचविले. या गोष्टीमुळे शाहू महाराजांनी खंड्याला आपल्या दरबारात एक स्थान दिले. तसेच जहागिरीदेखील दिली. खंड्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच त्याच्या अस्थींचे विसर्जन न करता त्या ज्या ठिकाणी पुरल्या, तिथे लाल दगडाचे स्मारक उभारण्यात आले. स्वतः चार्ल्स किनकेड यांनी ती प्रतिमा पाहिल्याचे ते नमूद करतात. 

पुस्तकाचे मुखपृष्ठ

चार्ल्स किनकेड असेदेखील नमूद करतात, की छत्रपती शाहू महाराजांची समाधीदेखील उन्हापावसाच्या माऱ्यामुळे भग्नावस्थेत पाहायला मिळते. त्या स्मारकावर दोन शिवलिंगे पाहायला मिळतात. याबाबत एक कथा सांगितली जाते, असे चार्ल्स किनकेड म्हणतात. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर सुरुवातीला एक शिवलिंग होते. परंतु ते पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले म्हणून त्या समाधीवर शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली गेली. काही कालावधीनंतर नदीच्या पुराबरोबर वाहून गेलेले शिवलिंग वाळूमध्ये सापडले. म्हणून त्याचीदेखील परत प्रतिष्ठापना केली गेली. 

चार्ल्स किनकेड लिहितात, की इतक्या वर्षांनंतरदेखील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा केली जाते. हे षोडशोपचार कोणते आहेत तेदेखील ते नमूद करतात. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा पद्धतीने पूजा केली जाते. ही पूजा पाहायची चार्ल्स किनकेड यांना फार उत्सुकता होती. त्यांनी तेथील पुजाऱ्याला विचारले असता तेथील पुजाऱ्याने पूजा पाहण्यासाठी चार्ल्स किनकेड आणि मंडळींना परवानगी दिली. 

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीच्या पूजेचेही वर्णन चार्ल्स किनकेड यांनी केले आहे. या समाधीच्या इथे आलेल्या दोघा-तिघा व्यक्तींच्या हातामध्ये चांदीची मूठ असलेले मोरपिसांचे पंखे होते. पंख्यांनी समाधीवरच्या राजचिन्हांना वारा घातला गेला. त्याच्यानंतर गगनभेदी तुतारी वाजवली गेली. पुजाऱ्याने मूर्ती आणि शिवलिंग स्वच्छ धुतले. तसेच त्याच्यावर हळद आणि कुंकू वाहिले. तांदळाचे दाणे त्या दोघांच्या भोजनाप्रीत्यर्थ उधळले गेले. पुन्हा एकदा वारा घातला गेला, तुताऱ्या वाजवल्या गेल्या. तसेच धूप- उदबत्ती यांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता. या धुरामुळे अंधार अधिक धुरकट झाला. या धुरकट वातावरणात छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा उभी राहिल्याचा भास झाला, असे चार्ल्स किनकेड यांनी आपल्या या प्रवासवर्णनामध्ये नमूद केले आहे. 

जेव्हा तुताऱ्या पुन्हा एकदा वाजल्या, तेव्हा चार्ल्स किनकेड भानावर आले. समाधीची षोडशोपचारे पूजा झाल्यावर पुजाऱ्याने पोर्तुगीज घंटादेखील वाजवली आणि सगळीकडे फुले उधळली. पुजाऱ्याप्रमाणे या संगम माहुलीच्या सहलीला आलेल्या आम्ही सगळ्यांनी गुडघे खाली टेकवून छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला नमस्कार केला, असे किनकेड यांनी लिहिले आहे. 

अशा या भारावलेल्या वातावरणामध्ये आमची संगम माहुली येथील सहल समाप्त झाली. सगळी मंडळी मोटारीत बसली आणि आम्ही सगळे काही वेळात साताऱ्यामध्ये आलोसुद्धा, अशा शब्दांत किनकेड यांनी शेवट केला आहे.

असे हे संगम माहुलीच्या सहलीचे ११२ वर्षांपूर्वी लिहिलेले वर्णन नक्कीच महत्त्वाचे ठरते. ११२ वर्षांपूर्वी चार्ल्स किनकेड यांनी पाहिलेल्या किती तरी गोष्टी काळाच्या ओघामध्ये बदललेल्या आहेत, हे आपण जेव्हा संगम माहुली हे स्थान पाहायला जातो तेव्हा नक्कीच समजते. 

- अनुराग वैद्य

(संदर्भग्रंथ : द टेल ऑफ द तुलसी प्लँट अँड अदर स्टडीज : C. A. KINCAID, D. B. Taraporwala & Sons, 1916)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RUVPCU
Similar Posts
वेरूळ येथील कैलास मंदिराची एक नाही, तर दोन आश्चर्ये!! वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही
Hindu and Jain temples of Abhapur - Intricate Windows Intricate जाली windows at the Jain temple of Abhapur, in Polo Forests. Every single jaali is different from another. No pattern is repeated. Think of the creativity involved, the strategic design thinking that must have gone into this. The play of light and shade is so intriguing. Chiaroscuro they call
कर्नाटकातलं अप्रतिम लक्ष्मी-नरसिंह मंदिर कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यात होसाहोलालू येथे वसलेलं लक्ष्मी-नरसिंह मंदिर म्हणजे होयसळ शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची माहिती देत आहेत शेफाली वैद्य...
लेपाक्षी मंदिरातील लटकता खांब (व्हिडिओ) आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातल्या लेपाक्षी मंदिराची अनेक वैशिष्ट्यं आहेत. सोळाव्या शतकात बांधण्यात आलेलं हे मंदिर ७० खांबांवर उभं आहे; पण त्यातला एक खांब जमिनीला टेकलेलाच नाहीये. याबद्दल अधिक माहिती देणारा हा व्हिडिओ...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language